Saturday, October 6, 2012

पारसी आणि वैदिक संस्कृती | लक्षणीय अल्पसंख्य
पारसी आणि वैदिक संस्कृती
मंदार उपाध्ये

स्वातंत्र्यलढय़ामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये पारसी समाजाचे योगदान मोलाचे आहे. आपल्या सर्व परंपरा, संस्कृती जपत पारसी समाज भारतीय समाजात मिसळून गेला आहे. पारसी आणि हिंदू धर्मात अनेक साम्यस्थळे दिसतात. पारसी समाजाच्या इतिहासाचा, धर्माचा, संस्कृतीचा वेध.
अलीकडेच ‘शिरीन फरहाद की निकल पडी’ नावाचा हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला. पारसी समाजाचं प्रतिबिंब त्या सिनेमात होतं. बाहेरून येऊन इथे दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून गेलेला हा समाज. पारसी अग्यारी, ऑगस्ट महिन्यातला पतेती हा सण याशिवाय आपल्याला पारसी समाजाबद्दल फारसं काही माहीत नसतं. खरं तर भारतात विविध क्षेत्रांत मोलाच्या, मान्यवर संस्था उभारण्यात पारसी समाजाचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या अर्वाचीन इतिहासात पारसी समुदायाचे योगदान त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या मानाने खूप जास्त व जीवनाच्या विविध क्षेत्रात झालेले ठळकपणे दिसून येईल. वानगीदाखल, दादाभाई नौरोजी, फिरोझशहा मेहता, जमशेदजी टाटा, मादाम भिकाजी कामा, सर जमशेटजी जिजीभाय, जे. आर. डी. टाटा, डॉ. होमी भाभा, अर्देशीर आणि पिरोजशा गोदरेज बंधू, फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, नरिमन कॉन्ट्रॅक्टर, संगीतकार झुबीन मेहता, रतन टाटा, शिआमक दावर, बोमन इराणी, फली नरिमन, नानाभोय ‘नानी’ पालखीवाला, सोली सोराबजी अशी भारतीय पारसी लोकांची देदीप्यमान परंपरा क्षणार्धात डोळ्यांसमोर येते. विशेषत: अल्पसंख्य असूनही कुठलाही धार्मिक उन्माद न करता अतिशय शांततेत राहून आपली व देशाची प्रगती करणाऱ्या पारसी समुदायाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
पारसी समुदायाची ओळख
वांशिकदृष्टय़ा पारसी लोक हे इंडो-युरोपिअन मानववंश शाखेचे सदस्य व त्या शाखेच्या वैशिष्टय़ांप्रमाणे सामान्यत: उंच, गोरे, बळकट बांध्याचे, मोठे कपाळ, सरळ व मोठे नाक, मोठे डोळे (सामान्यत: काळे, पण इतरही रंगांच्या छटा असलेले) असे दिसतात. अर्थात हे वर्णन खूपच ढोबळ व एकंदर समुदायाचे आहे.
पारसी लोक पूर्वी इराण व आसपासचा मध्य-पूर्वेचा प्रदेश इथले रहिवासी. पारसी नाव हे इराणमधील पर्स या प्रांतावरून आले. ग्रीक लोक या प्रांताला व कालांतराने त्या राज्याला - पर्शिआ म्हणू लागले व तेथील लोकांना- पर्शिआ चे रहिवासी ते ‘पर्शिअन.’ या पिशर्अनना भारतीय लोक पारसी म्हणत. कालिदासाच्या रघुवंशातदेखील रघुदिग्विजयाच्या वर्णनात पश्चिमेकडील पारसिक देशाचा उल्लेख आहे. पारसी धर्म हा फार प्राचीन-ख्रिस्ती व ज्यू धर्माच्याही फार पूर्वीचा धर्म आहे.
प्राचीन इराणी पूर्वज
आजच्या पारसी लोकांचे पूर्वज प्राचीन इराणी लोक हे इंडो-युरोपिअन भाषिक समूहाच्या इंडो-इराणीयन शाखेचा एक भाग होते आणि प्राचीन इंडो-आर्यन (वैदिक आर्य) लोकांशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता. त्यामुळे प्राचीन वैदिक आणि इराणी लोकांची भाषा, साहित्य आणि संस्कृती यात अतिशय साम्य आहे. अतिप्राचीन काळी हे इराणी लोक व वैदिक आर्याचे पूर्वज उत्तर ध््राुवाच्या परिसरात एकत्र राहत होते, असे लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘आर्टिक होम इन वेदाज’ या अद्वितीय संशोधनपर ग्रंथात अनेक पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्यानंतर काही काळाने व कारणाने (कदाचित हिमयुगामुळे?) या इंडो-इराणीयन लोकांचे समुदाय दक्षिणेकडे सरकले. त्यातील काही टोळ्या कास्पिअन समुद्राला वळसा घालून त्याच्या दक्षिणेला इराण, उत्तर इराक इ. परिसरात स्थिरावल्या. हेच आजच्या पारसी लोकांचे पूर्वज होय. याच इंडो-इराणीयनांच्या इतर टोळ्या आणखी पुढे जाऊन खबर, बोलन या खिंडींतून हिमालयाच्या रांगा ओलांडून भारतीय उपखंडात आल्या. हेच वैदिक आर्य लोक होत.
अति प्राचीन काळी इराणी लोक व वैदिक आर्य उत्तर ध्रुवाच्या परिसरात एकत्र राहत होते. या वेळी दोन्ही समाजांचा धर्म एकच असावा. हा अतिप्राचीन काळ - आजपासून किमान ७००० ते ८००० वर्षे पूर्वीचा [*१] - होय. या नंतर काही काळाने इंडो-इराणीयन लोकांचे दक्षिणेकडे स्थलांतर झाले. हा काळ वेदांचा रचनाकाल होय. याच काळात कधीतरी झरतुष्ट्र या आजच्या पारसी धर्माचा संस्थापक, प्रेषिताचा जन्म झाला. त्याला परमेश्वराने (याला पारसी लोक अहुर मज्दा म्हणतात) दशर्न देऊन नवीन धर्माची मूलतत्त्वे सांगितली व उपदेश केला. त्या नंतर झरतुष्ट्राने नवीन झरतुष्ट्रीय (पारसी) धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. या धर्माचा उपदेश त्यांनी गाथांमध्ये लिहून ठेवला. गाथांची मूळ भाषा व वेदकालीन संस्कृत यांत अतिशय साम्य आहे. या नंतर हजारो वर्षे इराणी लोकांवर त्यांच्याच इराणी वंशाच्या राजांची तर कधी परकीय राजघराण्यांची सत्ता चालली. इ.स. पूर्व ३३०मध्ये अलेक्झांडरने इराणीसम्राट दारीउश याचा पराभव करून इराणी साम्राज्याचा पाडाव केला. या वेळी त्याने राजधानी पर्सेपोलीस येथील राजवाडा व इतर अनेक महत्त्वाच्या इमारतींना आगी लावल्या. त्यांत प्राचीन ग्रंथ व साहित्याचे अपरिमित नुकसान झाले. मूळ अवेस्ताचा बराच भाग याच आगीत जळून कायमचा नष्ट झाला. आज आपल्याला दिसतात त्या गाथा व अवेस्ता हे नंतरच्या काळार्त संकलित व लेखन केलेला फार थोडा भाग होय. यानंतर काही काळ इराणी सासानिड घराण्याने इराणवर राज्य केले. मात्र मुसलमानी रानटी धर्मांध टोळ्यांच्या आक्रमणापुढे अंतर्गत कलहाने खिळखिळ्या झालेल्या यझ्देझार्द च्या राज्याचा इ.स. ६३३मध्ये पाडाव झाला आणि सुरू झाले पारसी संस्कृतीचे निर्दालन. खरोखर मुसलमानी आक्रमणापासून म्हणजे सुमारे इ.स.६३३पासून ते १८व्या शतकापर्यंतचा काळ म्हणजे पारसी धर्म, संस्कृती व समाजाच्या सर्वंकष अवनतीचा नव्हे, सर्वनाशाचा काळ होय. स्वराज्य गेले त्याबरोबरच धर्माला असलेला राजाश्रयही गेला. उलट मुसलमानी धर्मांध जेत्यांनी पारसी समाजापुढे तीन पर्याय ठेवले. इस्लाम स्वीकारा, अथवा काफिरांना द्यावा लागतो तो (अतिशय जाचक) जिझिया कर भरा व हे दोन्ही मंजूर नसेल तर (मरेपर्यंत) लढायला तयार व्हा. अर्थातच जेत्यांचे प्राधान्य पहिल्या पर्यायालाच होते. पारसी समाजापुढे हा एकप्रकारे त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता. नुसता त्यांच्याच अस्तित्वाचा नाही तर जी उदात्त, उच्च जीवनप्रणाली व मूल्ये त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी स्वीकारली होती त्यांच्यादेखील. अखेर आपल्याच देशात हतबल झालेल्या पारसी समाजाने धर्मरक्षणासाठी देशांतर करायचे ठरवले. मोठय़ा प्रमाणावर पारसी समाज देशाबाहेर पडला. जो पारसी समाज स्वदेशातच राहिला, त्याला प्रचंड धार्मिक छळ, अवास्तव कर याचा सामना करावा लागला. परिणामी, पुढच्या एक दोन शतकांच्या काळात छळाला कंटाळून, करमुक्तीच्या आशेने इ. विविध कारणांनी बहुसंख्य समाजाने इस्लाम स्वीकारला. तुलनाच करायची तर सध्याच्या [*२] इराणमध्ये सुमारे ७५ लाख लोकसंख्येपैकी केवळ सुमारे ३०००० (०.४ टक्के) लोक पारसी आहेत! ह्या उलट २००१च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे ७०००० पारसी आहेत.
देश सोडून निघालेला पारसी समुदाय मुख्यत: पश्चिमेस युरोप व पूर्वेस भारतात आला. पूर्वेला भारत सगळ्यात जवळ म्हणून किंवा भारताशी पूर्वापार संबंध असल्याने परिचित प्रदेश म्हणून असेल म्हणून किंवा त्यांना येथील सहिष्णु व उदार हिंदू संस्कृतीची माहिती असेल म्हणून कदाचित, पण स्थलांतरित पारसी लोकांचा सगळ्यात मोठा समुदाय हा भारतात आला व पश्चिम किनाऱ्यावरील कराची, भरूच, सुरत, ठाणे, मुंबई इ. बंदरांमध्ये उतरला व आसपासच्या परिसरात स्थायिक झाला.
पारसी व प्राचीन वैदिक संस्कृतीतील संबंध/ सांस्कृतिक दुवे :
पारसी समाज व भारतीय (प्राचीन वैदिक हिंदू) समाजाचा परस्परसंबंध अर्वाचीन काळातच नव्हे, तर फार प्राचीन काळापासून आहे हे आपण वर पाहिले. हा एकसारखेपणा व संबंध हे मुख्यत: खालील प्रकारांत मोडतात:
अ) भौगोलिक परिस्थिती:
१) अवेस्तामध्ये ऐर्यन वएजो ही आयार्ंची प्राचीन जन्मभूमी (वएजो - बीज (सं.)) अथवा स्वर्गभूमी असल्याचा उल्लेख आहे. याचे वर्णन ध्रुव-प्रदेशाशी जुळते (सात महिने सुखकारक उन्हाळा व पाच महिने हिवाळा). वेदांमध्येही अनेकऋचांमध्येदीर्घ रात्रींचे व इतर भौगोलिक विस्मयजनक घटनांचे उल्लेख आहेत जे केवळ ध्रुव-प्रदेशाशी निगडित आहेत.
२) अवेस्तातील फर्वर्दिन यस्तमध्ये हिवाळ्यात प्रवाहांची व सूर्याची गती कुंठित होण्याचे उल्लेख आहेत. तसेच हिवाळ्यात पुन्हा प्रवाह सुरू होईपर्यंत मृत शरीर दोन रात्री, तीन रात्री किंवा अगदी महिनाभर घरातच राखून ठेवण्याच्या प्रथेचा उल्लेख आहे. याचे कारण तेव्हाच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कारांस सूर्याची आवश्यकता असावी व म्हणून दीर्घ रात्रीत मृत्यू आल्यास शव दीर्घ काळपर्यंत तसेच जतन करून ठेवावे लागत असावे. आज परिस्थिती तशी नसली व आपण आता रात्रीदेखील अंतिम संस्कार करत असलो तरीही भारतीय हिंदूंमध्ये आजही रात्रीचा मृत्यू अशुभ मानतात. त्या भावनेचे मूळ या प्राचीन परंपरेत असू शकेल.
३) त्रित आप्त्याची व थ्राएतोनची कथा : ऋग्वेदात त्रित आप्त्याची कथा आहे. तीन भावांपैकी त्रित हा तिसरा. दुसरे दोन भाऊ त्याला खाचेत ढकलतात. अवेस्तामध्ये पण थ्राएतोनची अशीच कथा आहे.वास्तविक ही कथा म्हणजे ध्रुवीय प्रदेशातील चार महिन्यांच्या दीर्घरात्रींची रूपकात्मक कथा आहे. १२ मासांच्या वर्षांचे चार महिन्यांचे तीन भाग होतात. व त्यातला तिसरा भाग म्हणजे त्रित - हा भाग रात्रीचा असल्याने (अर्थातच) सूर्य अंधारात (पाताळात किंवा जळात) असतो असे ऋग्वेद म्हणतो. या विषयी अधिक विवेचन टिळकांच्या 'Arctic Home in the Vedas' मध्ये आहे.
आ) पूज्य देवता, स्थाने व इतर नामे :
वेद व अवेस्तामध्ये देवदेवतांविषयक दुवेही पुष्कळ प्रमाणात आहेत. अनेक वैदिक नावांचे उल्लेख अवेस्तामध्ये सापडतात. उदा. (कंसातील अपभ्रंशित/रूपांतरित नावे अवेस्तामधील): देव (दैव), असुर (अहुर), मित्र (मिथ्र), वरुण (वरेण), विवस्वान (विवहवंत), यम (यिम), सोम (होम, हओम), मास (माह), सप्तसिंधू (हप्तहिंदू), सरस्वती (हरहवैती), वसिष्ट (वहिष्ट) हे अजून काही, वेदांतील नद्या (सरस्वती), वनस्पती (सोम), कालगणना (मास), प्रदेश (सप्तसिंधू) यांचे अवेस्तातील उल्लेख.
हे उल्लेख केवळ बादरायणसंबंध जोडणारे नाहीत. कारण या दोन ग्रंथांच्या रचनाकाळात, वर्णनात व भाषेतही साम्य आहे. अशी इतरही अनेक उदाहरणे आहेत जी विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीत.
इ) धार्मिक विधी :
१. यज्ञ : पारसी धर्मात प्राचीन यज्ञ संस्कृतीचा अंतर्भाव होतो. परंतु यज्ञातील पशुबळी इ. प्रथा मात्र त्यातून वगळल्या आहेत. वैदिक परंपरेप्रमाणेच पारसी यज्ञात - त्यांना यस्न म्हणतात - एक मुख्य पुरोहित व इतर सहाय्यक पुरोहित असतात. वैदिक यज्ञात १६ पुरोहित असत. पारसी यस्नमध्ये आठ पुरोहित असत. मुख्य पुरोहितास झओतर (होतार (सं.)) म्हणतात. वैदिक ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच यस्नाचे विधी व त्यांचे तपशीलवार वर्णन यस्न ग्रंथात आहे.
२. नौरोझ (नवरोझ) : पारसी नववर्षांदिन पूर्वी नवरोझ म्हणून उत्तर वसंतसंपात दिनी (म्हणजे सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा) साजरा होत असे.[*३] वैदिक कालगणनादेखील वसंत संपात बिंदूपासून सुरू होत असे. आजही भारतीय सौर (निरयन) कालगणनेप्रमाणे नवीन वर्ष (चैत्र १) वसंत संपात दिनी (साधारणपणे २१-मार्च ला) सुरू होते. (महाराष्ट्रात, व्यवहारातील चांद्रवर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते.)
३. यज्ञ-संस्कृतीचे महत्त्वाचे भाग - सोमाहुती व सोमप्राशन हे अवेस्तामध्येदेखील वर्णन केलेले आहेत. (अवेस्तात त्याला हओम/होम म्हणले आहे)
४. विदैवोदात (ज्याला चुकीने वेन्दिदाद म्हटले जाते) त्या अवेस्ताचा भाग असलेल्या ग्रंथाच्या नवव्या फ्राकार्त मध्ये मृताच्या संपर्कात येऊन अशुद्ध झालेल्या व्यक्तीच्या शुद्धिकरणाचा विधी दिलेला आहे. त्यात पवित्र बैलाच्या मूत्राने (गोमूत्र) शुद्धिकरण करण्याची पद्धती दिलेली आहे. भारतीय हिंदूंत गोमूत्राचे पावित्र्य सर्वश्रुत आहे. फक्त आपल्याकडे गायीचे मूत्र वापरले जाते.
ई) भाषा : 
या प्राचीन संबंधांचा आणखी एक ठोस पुरावा म्हणजे भाषाशास्त्रीय पुरावा. वेदकालीन संस्कृत व अवेस्तातील गाथांची भाषा यांत व्याकरण, रचना व शब्दकोशदृष्टय़ा आश्चर्यकारक साधम्र्य आहे! उदा.:
१) संस्कृत वर्णमालेत १५ स्वर व ३३ व्यंजने आहेत तसेच जोडाक्षरेही आहेत. अवेस्तांमध्येदेखील तसेच १५ स्वर व ३५ व्यंजने आहेत.
२) संस्कृतात नुसत्या वर्णाने शब्द होऊ शकत नाही. शब्दासाठी व्यंजनात स्वर मिळवून त्याचे अक्षर बनवावे लागते. जसे: म् (वर्ण) + अ (स्वर) = म (अक्षर). अगदी तसेच अवेस्तांमध्येदेखील प्रत्येक व्यंजनापुढे स्वर जोडावा लागतो.
३) संस्कृतप्रमाणेच अवेस्तांमध्येदेखील व्यंजनांची वर्गवारी त्यांच्या उच्चारस्थानाप्रमाणे केलेली आहे उदा. : दन्त्य, ओष्ठय़, तालव्य, कंठय़ इ.
४) संस्कृतप्रमाणेच अवेस्तनमध्येदेखील संधि (एकाच अथवा भिन्न शब्दांतील लागोपाठच्या दोन अक्षरांचे एकत्रीकरण) आहे व त्याला संधि असेच म्हणतात! संस्कृतप्रमाणेच स्वर-संधीचे आणि व्यंजन-संधीचे वेगळे नियमही आहेत.
५) संस्कृत व अवेस्तामध्ये बहुसंख्य धातू (क्रियापदांचे मूळ रूप)देखील सारखेच आहेत. संस्कृतप्रमाणेच धातूंचे गुण आणि वृद्धी आहेत!
या व अशाच इतर अनेक पुराव्यांवरून संस्कृत ही अवेस्ताची जननी अथवा भगिनी (एकाच मूळ भाषेवरून दोन्ही निर्माण झाल्या) आहे हेच निर्विवादपणे सिद्ध होते.
शब्द-मर्यादेमुळे वर काही ठळक मुद्दे मांडले. असे इतर अनेक मुद्दे आहेत की जे या दोन अति-प्राचीन संस्कृतींचे भिन्नत्व सिद्ध करतात.
पण या अतिप्राचीन इतिहासाचे इतर अनेक पदर पुरेशा पुराव्याअभावी अंधारात तरी आहेत किंवा केवळ तर्काच्या पातळीवर आहेत. इंडो-इराणीयन संस्कृतीचा इतिहास-तिच्या प्राचीनत्वामुळे- एक प्रकारे मानवजातीचाच इतिहास ठरतो. त्यामुळे भविष्यातील संशोधनातून या तर्कांना समर्थक किंवा बाद करणारे पुरावे समोर येतील आणि या अज्ञात कालखंडावर आणखी प्रकाश पडून मानवजातीच्या प्राचीन इतिहासाची कहाणी स्पष्ट होईल अशी आशा करू या.
[*१] डॉ. प. वि. वर्तकांसारख्या अलीकडील विद्वानांनी तर पूर्वसुरींनी केलेल्या ज्योतिष-शास्त्रीय (Astronomical) विश्लेषणातील व त्यामागील गृहीतकांतील काही त्रुटी दाखवून त्या दूर केल्यास जुन्यात जुन्या वैदिक द्घ.चांचा काळ हा २३००० इ.स. पूर्वी इतका अति -प्राचीन असल्याचे साधार दाखवले आहे.
[*२] इराणच्या २००६ च्या जनगणनेवर आधारित
[*३] हा नववर्षदिन बदलून सध्याचा पतेती ह्या दिवशी कसा आला ती एक स्वतंत्र, रोचक कथा आहे.
response.lokprabha@expressindia.com

No comments:

Post a Comment